पिंपरी (प्रतिनिधी):- सरकारचा पाठींबा काढला जाऊ शकतो, सत्तेतून कोणत्याही क्षणी आम्ही बाहेर पडू शकतो अशी भूमिका घेणार्या शिवसेनेने आज ‘यु टर्न’ घेतला आहे. आमचा कोणताही मोठा नेता सरकारचा पाठिंबा काढू असं म्हटला नव्हता. पण शिवसेनेची सरकारवर नाराजी आहे. सत्तेत राहून आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी दररोज सरकारचं ‘कानफाड’ फोडतोय असे सांगत खासदार संजय राऊत यांनी शिवसेना सत्तेतच राहिल असे संकेत दिलेत.
शिवसेना नेते आणि पुणे विभागीय संपर्कनेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत चिंचवड येथे विधानसभा निहाय बैठक आज घेण्यात आली. त्यांनतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
संजय राऊत म्हणाले की, सरकारचा पाठिंबा काढण्याचा मुहूर्त प्रसारमाध्यमांनी काढला होता. मध्यावधी निवडणुकांच्या अफवा पसरवल्या जात आहेत. कधीही निवडणुका घेतल्या तरी सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. कर्जमुक्ती झाली नाही तर राजकीय भूकंप होईल असे वक्तव्य केले होते. आता कर्जमाफी झाली असून ती अंमलात आणावी म्हणून आम्ही भांडतो आहोत. राजकारणात शिवसेना कच्चा लिंबू नाही. सत्तेची उलथापालथ कधीही करू शकतो. लोकांच्या प्रश्नासाठीच सत्तेत राहून देखील आम्ही आंदोलने करतोय. विरोधक सक्षम नाहीत म्हणून ही भूमिका घ्यावी लागत आहे. शिवसेनेने सत्तेत राहू नये ही लोकभावना असली तरी दररोज लोकांच्याच प्रश्नासाठी आम्ही सरकारचं कानफाट फोडतोय असे ते म्हणाले.
यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे, महिला आघाडीच्या शहरसंघटक सुलभा उबाळे आदि उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group