पिंपरी (Pclive7.com):- ट्रेडिंगची बनावट वेबासाइट तयार करून, ती खरी असल्याचे भासवून तब्बल २६ लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना एप्रिल, २०१२ ते १७ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत रहाटणी येथे घडली. या प्रकरणी विश्वनाथ मोहन गोसावी (वय ७२, रा. रहाटणी) यांनी गुरुवारी (दि. १७) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुंतवणुकीसाठी फोन करणाऱ्या सहा मोबाइल धारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मुलगा अजित यास फोन करून सूरज, जयदीप, प्रतीक यांनी आपण ऑटो एफएक्स ट्रेड या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. तसेच कंपनीची ट्रेडिंगची बनावट वेबसाइट तयार करून, ती खरी असल्याची बतावणी करून, अजित यास ट्रेडिंग केल्यास जास्तीतजास्त फायदा मिळवून देऊ, असे आमिष दाखविले.
तसेच अजित याला ट्रेडिंग अकाउंट तयार करण्यास लावून ए.यू.स्मॉल फायनान्स बँक खात्यावर वेगवेगळी कारणे सांगून सोळा लाख ९१ हजार रुपये गुंतविण्यास प्रवृत्त केले. तसेच फॉरेक्स ट्रेडिंगच्या आयडीवर चार कोटींचा नफा झाल्याचे दाखवत, पुन्हा दहा लाख रुपये देण्यास भाग पाहून अजित याची तब्बल २६ लाख ९१ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करत पैशाचा अपहार केला पोलीस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group