पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री शनिवारी चिंचवड दौऱ्यावर असताना त्यांच्यावर शाईफेक झाली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर रविवारी (दि.११) मोरवाडी न्यायालयात त्यांना हजर केले असता बुधवारपर्यंत (दि.१४) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मनोज भास्कर घरबडे (वय ३४, रा. पिंपरी), धनंजय भाऊसाहेब इजगज (वय २९), विजय धर्मा ओव्हळ (वय ४०, दोघेही रा. आनंदनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी (दि.१०) सायंकाळी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनानिमित्त चिंचवडगावात आले होते. ते भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या निवासस्थानावरून कार्यक्रम स्थळी जात असताना त्यांच्यावर शाईफेक झाली. याप्रकरणी पोलिसांनी समता सैनिक दल संघटक मनोज घरबडे, समता सैनिक दल सदस्य धनंजय इजगज आणि वंचित बहुजन आघाडी सचिव विजय ओव्हाळ या तिघांना अटक केली. खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, घोषणाबाजी, मानहानी, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)/१३५ नुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, शनिवारी तसेच रविवारीही (दि.११) या घटनेचे पडसाद शहरात उमटले. रविवारी सकाळी चापेकर चौक, चिंचवड येथे आंदोलन झाले. त्यानंतर शाईफेक प्रकरणी तिघांना पोलिसांनी मोरवाडी न्यायालयात हजर केले. त्यावेळी मोरवाडी येथेही आंदाेलकांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यामुळे मोरवाडी व चिंचवडसह शहरात ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.