पिंपरी (Pclive7.com):- बांधकाम साइटवर असलेला वाद मिटवून देतो, असे सांगून व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही घटना ९ मार्च २०२२ रोजी वाकड परिसरात घडली. याप्रकरणी विनायक किशोर गारवे (वय ३९, रा. नवी सांगवी) यांनी मंगळवारी (दि. २०) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी सोमनाथ लाहोट (वय ३९, रा. नवी सांगवी) यांच्यासह अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या व्यावसायिक पार्टनरसोबत बसलेले असताना आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या वडगाव येथे सुरू असलेली बांधकाम साइटचा वाद मिटवून देतो, असे म्हणत फिर्यादींकडे ५० लाख रुपये रोख तसेच १६,४०० स्क्वेअर फूट बांधकामाची मागणी केली.
फिर्यादी यांनी पैसे दिले नाहीत तर त्यांना काम करू न देण्याची तसेच कायमचे संपवून टाकण्याची धमकीही दिली. त्यानंतर १० मार्चला फिर्यादीकडे कामाला असलेल्या व्यक्तीला मेसेज करून धमकी दिली.