आळंदी (Pclive7.com):- आळंदी परिसरात एका महिलेला घरात घुसून मारहाण करत सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ एप्रिल रोजी आरोपी तिच्या घरात जबरदस्तीने घुसले. यावेळी त्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेत मारहाण केली. तसेच जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घर आमच्या नावावर करून दे, अन्यथा तुला आणि तुझ्या कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आरोपींनी दिल्याचाही दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. यापूर्वीही चार ते पाच महिन्यांपूर्वी आरोपी पीडितेच्या घरी आले होते. त्यावेळीही जबरदस्तीने शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच पीडितेच्या नातेवाईकांशी गैरवर्तन करून सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल चोरेडिया, कालिनाथ गुलाबराव घुले, युवराज खरमाटे आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलिसांनी गुन्हा नोंदवत घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.




















Join Our Whatsapp Group