पिंपरी (Pclive7.com):- माधवबाग पिंपरी, मोरवाडी आणि ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील रुग्णांची नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. वैभव अवताडे व डॉ. शितल मोरे यांनी जवळपास १०० रुग्णांची नेत्र तपासणी केली.

प्रत्येक घरामध्ये डायबिटीस, ब्लड प्रेशर यांचे रुग्ण आढळून येतात. आणि त्यांना डोळ्यांचा त्रास होण्याची देखील शक्यता असते. तसेच लोकांना याबाबत माहिती नसते. म्हणून माधवबाग मधील रुग्णांसाठी तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी आणि आजूबाजूच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचा उद्देश अचानक उद्भवणाऱ्या डायबेटिक रेटायनोपॅथीला वेळीच निदान करून आळा घालणे हा होता. डोळ्यांच्या आजाराचे निदान झाल्यानंतर त्यावर योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे, हे या शिबिरातून रुग्णांच्या निदर्शनास आले. या शिबिरात रुग्णांना डायबेटिक रेटायनोपेटी बद्दल डॉ. शितल मोरे (एमडी आयुर्वेद) यांनी मार्गदर्शन केले.

त्यांनी सांगितले की ,”इंटरनॅशनल डायबेटिक फेडरेशन नुसार भारतात 11.2% लोकांना डायबिटीज आहे. म्हणजे जवळपास साडेसात लाख लोक डायबिटीस सोबत जगत आहेत. त्यापैकी 70% लोकांना डायबिटीस रेटायनोपॅथी होण्याची शक्यता असते. डायबिटीस हा आजार सायलेंट किलर आहे. हळुहळू शरीरातील एक एक अवयव निकामी करत जातो. रेटायनोपॅथी मध्ये रेटीना (डोळ्यांच्या आतला पडदा) खराब होतो. अचानक डोळ्यांनी दिसणे कमी होऊ शकते, दृष्टी धूसर होते आणि परिणामी तुमचा डोळा देखील निकामी होऊ शकतो. म्हणूनच वेळोवेळी नेत्र तपासणी करणे लाभदायी ठरते. याबरोबरच या शिबिरात माधवबागने हृदयाची तपासणी म्हणजेच स्ट्रेस टेस्ट ही अतिशय कमी दरामध्ये नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्याचाही लाभ सर्व रुग्णांना व नागरिकांना होणार आहे. या शिबिराला रुग्णांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
माधवबाग टिमची अशी इच्छा आहे की, पिंपरी चिंचवड मधील जे डायबिटीज, बीपी आणि हृदयविकाराचे रुग्ण आहेत, त्यांना व्याधीमुक्त करावे आणि आपल्या आरोग्य विषयी नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे. आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. ईशा नेत्रालयचे डॉ. वैभव अवताडे आणि त्यांचे सहकारी यांचे या शिबिरात मोलाचे सहकार्य लाभले.






















Join Our Whatsapp Group