पिंपरी (Pclive7.com):- बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा मागास, आर्थिक दुर्बल आणि अल्पसंख्याक घटकांसाठी राखीव ठेवल्या जातात. यंदा राज्यभरातील ८ हजार ८२८ शाळामध्ये १ लाख १९६९ जागा रिक्त आहेत. त्यासाठी सुमारे तीन लाख ६४ हजार ४७० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील विद्यार्थ्यांना ‘आरटीई’तून मोफत प्रवेश मिळणार आहे. ५ एप्रिल बुधवारी या प्रवेशाची लॉटरी निघणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवारी दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) येथे काढण्यात येणार आहे, असेही शरद गोसावी यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न आर्थिक परिस्थितीमुळे पूर्ण होत नाही. त्या समाज घटकातील मुलांची स्वप्नपूर्ती ‘आरटीई’च्या माध्यमातून केली जाते. दरवर्षी राज्यातील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील एकूण प्रवेश क्षमतेतील २५ टक्के जागा राखून ठेवल्या जातात. कायद्यानुसार संबंधित शाळांसाठी ते सक्तीचे आहे.
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यातील आठ हजार ८२८ इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश मिळणार आहे.ऑनलाइन पद्धतीने लॉटरी काढली जाणार आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्णत: ऑनलाइन असल्याने त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप चालत नाही. लॉटरी निघाल्यानंतर प्रवेशासाठी ठराविक मुदत दिली जाते. त्यानंतरही काही जागा रिक्त राहिल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.
प्रवेश निश्चित करण्यासाठी संबंधित शाळेत जाताना पालकांनी त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, मुलाचे आधारकार्ड, अशी प्रवेश अर्जावेळी भरलेल्या माहितीनुसार सर्व कागदपत्रे घेऊन जावी लागतील. तसेच खुल्या प्रवर्गातील एसईबीसी प्रवर्गातील मुलांसाठी एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा पालकांचा उत्पन्न दाखला लागतो. दरम्यान, प्रवेश निश्चित झालेल्या म्हणजेच लॉटरीत नंबर लागलेल्या मुलांच्या पालकांच्या मोबाईलवर मेसेज येणार आहेत.