पिंपरी (Pclive7.com):- ‘पीएमआरडीए’ची जागा बिल्डराच्या घशात न घालता विकलेला भूखंड परत घ्यावा. तसेच त्या जागेवर शिवसृष्टी उभारण्यात यावी, अशी मागणी करत पीएमआरडीए कार्यालयासमोर भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव – समितीकडून बुधवार (दि.३) हलगी बजाओ आंदोलन करण्यात आले.
निगडीतील पेठ क्र.२४ व सर्व्हे नं.१२, १३ व १४ येथील जागेसंदर्भात बांधकाम व्यावसायिकांमध्ये झालेले सर्व व्यवहार रद्द करण्यात यावेत. या जागेत राज्य सरकार, महापालिका व पीएमआरडीएने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी उभारण्यात यावी. या जागेवर पालिकेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात यावी. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सवही या जागेवर करण्यात यावा.
भक्ती शक्ती शिल्प समूहासमोर मेट्रो स्टेशन होणार असल्यामुळे अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा स्थलांतर न करता याच जागेत बसविण्यात यावा. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती कार्यक्रमासाठी या जागेचा वापर करण्यात यावा. या जागेवर कुस्त्या, गावजत्रेचे कार्यक्रम होतात, अशी मागणी आंदोलनावेळी करण्यात आली. आंदोलनावेळी मारुती भापकर, मानव कांबळे, सतीश काळे, काशीनाथ नखाते, भाऊसाहेब अडागळे, युवराज कोकाटे, गणेश भांडवलकर, आलम शेख, संतोष इंगळे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.