पुणे (Pclive7.com):- शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता आणि वैशाख वणव्यापासून सर्वांचे रक्षण व्हावे, याकरिता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात ११ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे.
शुक्रवारी मंदिरात पूजा, गणेशयाग व अभिषेक झाला. गाभाऱ्यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती. पहाटे पद्मश्री डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर, आणि रागिणी शंकर यांचा व्हायोलीन वादनाचा कार्यक्रम झाला.
वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो. तसेच, दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.





















Join Our Whatsapp Group