पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी तापकीरनगर येथील बेबी स्कूल रोड शेजारील प्राईड सोसायटीच्या समोरील बाजूस डांबरीकरण करण्याची मागणी शिव व्यापारीसेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. शिवव्यापारी सेनेचे उपशहरप्रमुख गणेश श्रीमंत पाडुळे यांनी पत्रकान्वये याबाबत माहिती दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून तापकीरनगर येथील रहिवासी या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र स्थानिक पुढा-यांच्या नाकर्तेपणामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यास वेळोवेळी बगल दिली जात आहे. २७ जून २०१५ रोजी मोहन खुशीराम नावानी यांनी २९७ चौ. मी. जागा पिंपरी चिंचवड महापालिकेला हस्तांतरित केली आहे. जागेच्या हस्तांतरीकरणानंतर तात्काळ डांबरीकरणास सुरुवात व्हायला हवी. तरी देखील या जागेवर महापालिका प्रशासनाकडून केवळ मलमपट्टीचे काम करून पैसे खाण्याचा उद्योग केला जात असल्याचा आरोप पाडुळे यांनी केला आहे.
हस्तांतरित करण्यात आलेल्या २९७ चौ. मी. जागेलगत ‘प्राईड होम’ ही सोसायटी असून या ठिकाणी ८४ फ्लॅटधारक आहेत. रस्त्याअभावी त्यांना खूप खडतर त्रास सहन करावा लागत आहे. पुढील १५ दिवसात या रस्त्याचे काम चालू न केल्यास शिव व्यापारी सेना शहरप्रमुख युवराज भगवान दाखले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्टाईलने मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल. याच्या पडसादाची पूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील, असा इशारा पाडुळे यांनी पत्रकान्वये दिला आहे.





















Join Our Whatsapp Group