पुणे (Pclive7.com):- कामाला जातावेळी डब्बा बनवून दिला नाही म्हणून पतीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील कोंढवा परिसरातील होलेवस्ती येथे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.

शितल सोमनाथ पांडागळे (वय २७) असे मृत्यू झालेल्या महिलेचा नाव आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीसांनी पती सोमनाथ महादेव पांडगळे (वय ३०, रा. गणपती मंदिरच्या पाठीमागे उंड्री, होलेवस्ती कोंढवा, पुणे) याला अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती सोमनाथला शनिवारी सकाळी कामाला जायचे होते. यावेळी बायको शितलने डब्बा बनवून दिला नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा वाढला की पतीने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने, पायासह इतर भागावर वार केले. या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाली होती.

गंभीर जखमी झालेल्या पत्नीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पोलीसांनी नातेवाईकांशी विचारपूस केली. यावेळी शितला फिट आली होती, असे उत्तर त्यांनी दिले. मात्र, पती सोमनाथची पोलीसांनी चौकशी केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला असून आपण मारहाण केल्याची कबूली त्याने दिली. यानंतर पोलीसांनी पती सोमनाथ विरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. कोंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group