पिंपरी (Pclive7.com):- मोबाईल फोनवर बोलत पायी चालत जाणा-या नागरिकांचे महागडे मोबाईल, दुचाकीवरून धुम स्टाईलने येवून, हिसकावुन क्षणार्धात पळुन जाणा-या गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. संभाजीनगर परिसरात सापळा रचून गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने ही कारवाई केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात काही दिवसांपासून मोबाईल स्नॅचिंगच्या घटना वाढल्या होत्या. या गुन्हेगारी कारवायांना आळा घालणे व गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखा युनिट २ ने तपासाची चक्रे फिरवली होती. गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार यांनी मोबाईल स्नॅचिंग गुन्हे घडणा-या भागातील सीसीटीव्ही कॅमे-यांची सातत्याने तपासणी करून कसोशिने आरोपींचा शोध घेतला. मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे करणारे गुन्हेगार हे निर्जनस्थळावरून मोबाईल फोनवर बोलत पायी चालत जातांना नागरिकांच्या पाठीमागुन मोटर सायकलवरुन येवून अचानक मोबाईल हिसकावून धूम स्टाईलने क्षणार्धात गायब होत होते. त्यामुळे त्यांच्या मोटर सायकलचा नंबर व वर्णन मिळुन येत नव्हते. गुन्हे घडणा-या भागात सातत्याने पेट्रोलिंग करुन गोपनिय बातमीदारांना सतर्क करण्यात आले होते.
गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार अजित सानप व नामदेव कापसे यांना त्यांच्या गोपनिय बातमीदाराकडून बातमी मिळाली कि तीन जण हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल (नंबर एम एच १४ बीडब्लू ७०५३) यावरुन संभाजीनगर परिसरात मोबाईल विकायचे आहेत असे सांगुन संशयितरित्या फिरत आहेत. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट २ चे पथक संभाजीनगर भागात तात्काळ रवाना करुन संशयित आरोपींचा शोध घेतला व रोटरी क्लब चौक संभाजीनगर या ठीकाणी सापळा लावून मोटार सायकलवरून फिरणा-या तीन संशयित इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. १) राज उर्फ नन्या आनंद लष्करे वय १९ वर्षे रा. गोधंळे गल्ली, दत्तनगर रामनगर पिपरी २) केशव उर्फ ओम किशोर आलंकार वय १८ वर्षे रा. सचिन टेलर्स जवळ दत्तनगर पिंपरी – पुणे व त्यांचा एक अल्पवयीन साथीदार अशी आहेत. आरोपींकडे सखोल तपास केला असता त्यांनी चिखली, दीघी व पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मोटर सायकलवरून फिरून नागरिकांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून एकूण ६ अॅन्डाईड मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल असा एकूण १,३८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींकडून चिखली पोलीस ठाणे तसेच दीघी पोलीस ठाण्यात गुन्हे उघडकीस आले असुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group