पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी रात्री मुंबईत भेट घेतली. राहुल कलाटे हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी राहुल कलाटे यांच्यासोबत माजी नगरसेवक नवनाथ जगताप हे उपस्थित होते. तर काही माजी नगरसेवक देखील कलाटे यांच्यासोबत शिवसेनेत जाणार आहेत. त्यात माजी नगरसेवक नवनाथ जगताप, संपत पवार, माजी नगरसेविका अश्विनी वाघमारे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
याभेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत चर्चा करून पुढील दिशा ठरविणार आहे. त्यांच्यासारखा चांगला सहकारी भविष्यात मिळणार आहे. याचा मनापासून आनंद आहे. राहुल कलाटे यांचा करिष्मा आहे. त्यांच्या समवेत येणाऱ्या सहकार्यांमुळे मतदार संघाच्या विकासाच्या कामाला गती दिली जाईल.
याबाबत बोलताना राहुल कलाटे म्हणाले की, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आज सर्वसामान्य जनतेला थेट कनेक्ट होणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आहे. सामान्यांचे मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. आमचे प्रश्न ते सोडवू शकतात याची खात्री पटल्याने त्यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय केला आहे.
राहुल कलाटे यांचा राजकीय प्रवास..
राहुल कलाटे २००२ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर महापालिका निवडणुकीत पराभूत झाले. २०१४ च्या विधानसभेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढली, त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. २०१७ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक झाले. त्यांनी वाकड भागाचे प्रतिनिधित्व महापालिकेत केले. ते शिवसेनेचे गटनेते, तसेच शहरप्रमुख देखील होते. त्यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित आघाडीच्या पाठिंब्यावर चिंचवडमधून विधानसभा निवडणूक लढविली. भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना कडवी झुंज दिली. दिवंगत आमदार जगतापांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीवेळी महाविकास आघाडीतून बंडखोरी करून निवडणूक लढविली परंतु त्यांचा पराभव झाला.
(सद्यस्थितीत राहुल कलाटे हे चिंचवड विधानसभा मतदार संघातील एक ताकदीचा नेता म्हणून ओळखले जातात. मोठा तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी कलाटे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.)