पिंपरी (Pclive7.com):- गाडी धुतल्याचे पैसे मागितल्याने तिघांनी मिळून वॉशिंग सेंटरचालकाला मारहाण केली. तसेच, वॉशिंग सेंटरची तोडफोड केली आहे. ही घटना रविवारी (दि.३०) रात्री वाकड येथील प्रतिभा हिरो शोरूम समोर घडली.
याप्रकरणी सुमित दत्तात्रय शिंदे (२९, रा. चिंचवड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सिद्धार्थ विठ्ठल जौंजाळ (३५, रा. चिंचवड) याला अटक केली आहे. तसेच, राहुल विठ्ठल जवंजाळ (३८) आणि एक महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वॉशिंग सेंटर आहे. दरम्यान, आरोपी दुचाकी घेऊन तेथे आले. दुचाकी धुतल्यानंतर पैसे मागितले असता ‘तुझ्या मालकाचा मी दाजी आहे’ असे म्हणत आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी जागा मालक सचिन केदारी यांना बोलावून घेतले. केदारी यांनीही ते नातेवाईक असल्याचे मान्य केले. मात्र, त्यानंतर काही वेळाने पुन्हा येऊन आरोपींनी वॉशिंग सेंटरची तोडफोड केली. तसेच, फिर्यादी व त्यांचा मित्र यांना धक्काबुक्की केली. फिर्यादी यांच्या मित्राची सहा तोळ्याची अडीच लाख रुपयांची सोन्याची चेन आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतली. पोलिसात तक्रार दिली तर सर्वांना मारून टाकेन, अशी धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.