पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या के.आर. टोळीचा प्रमुख किरण राठोड याच्यासह तिघांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १२ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी चोरीचे दागिने घेणाऱ्या तीन सोनारांना देखील आरोपी केले आहे.

किरण गुरुनाथ राठोड (वय २६, रा. दिघी), अर्जुन कल्लप्पा सुर्यवंशी (वय १९, रा. कोरेगाव भीमा), संतोश जयहिंद गुप्ता (वय १८, रा खंडोबा माळ, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहर परिसरात मागील अनेक महिन्यांपासून घरफोड्या करणारा के.आर. टोळीचा प्रमुख दिघी परिसरात ओळख लपवून वास्तव्य करीत आहे, अशी माहिती दरोडा विरोधी पथकातील दिवंगत पोलीस अंमलदार राजेश कौशल्ये यांना मिळाली. त्यानुसार दिघी परिसरात सापळा लावून किरण राठोड याच्यासह तिघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून एक कार, १८७ ग्रॅम सोने, एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण १२ लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी किरण राठोड हा पाच घरफोड्या आणि एक दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता. आरोपींनी चोरलेले दागिने कोरेगाव भीमा येथील दोन आणि परभणी येथील एका सराफ व्यावसायिकाला विकला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या तीनही सराफ व्यावसायिकांना देखील आरोपी केले आहे. तसेच दागिन्यांची विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या एकाला देखील पोलिसांनी आरोपी केले आहे.
ही कारवाई विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सतिश माने, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार राजेश कौशल्ये, सुमित देवकर, गणेश सावंत, विनोद वीर, आशिष बनकर, गणेश हिंगे, गणेश कोकणे, उमेश पुलगम, समिर रासकर, अमर कदम, महेश खांडे, नितीन लोखंडे, सागर शेडगे, राहुल खारगे, चिंतामण सुपे, औदुबर रोंगे, नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.



















Join Our Whatsapp Group