पिंपरी (Pclive7.com):- भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते आणि युवा नेतृत्व अमित गोरखे यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीवर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी गोरखे यांची नियुक्ती केली.
भाजपच्या महाराष्ट्र कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी अमित गोरखे यांना नियुक्तीचे पत्र दिले. गोरखे यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे काम आहे. त्यांचे कार्य पाहून पक्षाने गोरखे यांची प्रदेश कार्यकारणीवर नियुक्ती केली आहे.
केंद्र आणि राज्य सरकार गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. गोरगरिबांची प्रगती करण्यासाठी विविध चांगल्या योजना आणल्या जात आहेत. त्याची अंमलबजावणी देखील सुरु आहे. परंतु, अनेक नागरिकांना योजनांबाबत माहिती मिळत नसल्यामुळे ते त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे अमित गोरखे यांनी निवडीनंतर सांगितले.
प्रदेश कार्यकारणीवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, खासदार रावसाहेब पाटील दानवे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे मी मनापासून आभार मानतो. पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीन, असे गोरखे यांनी सांगितले. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल गोरखे यांना २०१२ साली भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे पिंपरी चिंचवड शहरातील ते एकमेव आहेत.
खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, माजी खासदार गजानन बाबर, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा साळवे, सदाशिव खाडे, उमा खापरे, महेश कुलकर्णी, वसंत वाणी, नगरसेविका अनुराधा गोरखे, अमर मुलचंदानी, राजेश पिल्ले, प्रमोद निसळ यांच्यासह पक्षातील सर्व पदाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षबांधणीसाठी काम करणार आहे, असेही गोरखे यांनी सांगितले.
























Join Our Whatsapp Group