पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक असलेले माजी महापौर संजोग वाघेरे पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शनिवार दिनांक ३० डिसेंबर रोजी वाघेरे शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचे त्यांनी पीसी लाईव्ह न्यूज बोलताना सांगितले.
अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक असलेले संजोग वाघेरे पाटील यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली होती. पीसी लाईव्ह न्यूज ने यासंदर्भात सर्वात प्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते. वाघेरे यांच्या भेटीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. वाघेरे आता ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान आज संजोग वाघेरे यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. शनिवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता पिंपरीगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून आपल्या समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत ते मुंबईच्या दिशेने पक्ष प्रवेशासाठी रवाना होणार आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करिता संजोग वाघेरे पाटील इच्छुक आहेत. या संदर्भात त्यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली होती. त्यानुसार त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्यामुळेच वाघेरे यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. संजोग वाघेरे पाटील यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठे खिंडार पडणार आहे. शांत, संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्व अशी संजोग वाघेरे पाटील यांची ओळख आहे. सुरुवातीपासून अजित पवार यांच्यासोबत शहरात पक्ष वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. नगरसेवक, महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविले आहेत. पिंपरी चिंचवड शहरासह संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात त्यांचा मोठा मित्रपरिवार, नाती-गोती आहेत. त्यामुळे मावळमध्ये शिवसेनेची उमेदवारी संजोग वाघेरे पाटील यांना मिळाल्यास नक्की त्यांचा विजय होईल असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
























Join Our Whatsapp Group