मुंबई (Pclive7.com):- रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीच्या संदर्भात विविध चर्चा सुरू होत्या.
रश्मी शुक्ला यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त, अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), डीआयजी (प्रशासन), नागपूरच्या एसपी आणि सोलापूरचे डीसीपी म्हणून काम पाहिलंय. या सोबतच त्यांची राज्य गुप्तचर विभागात (SID) आयुक्त म्हणून बदली झाली होती.
त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी मधील काही राजकीय नेत्यांची फोन टॅपिंग केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ उडाला होता.
शुक्ला यांच्यावरती पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी वेगवेगळे दोन गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. पुढे दोन्ही गुन्हे कोर्टाने रद्द केले. आज अखेर रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने या संदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे.