पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांमध्ये चारचाकी व दुचाकी तोडफोडीचे सत्र सुरू असून अशा प्रकारे उपद्रवी व्यक्तींकडून समाजात दहशत माजवली जात आहे. खेड्यापाड्यांतून पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात आलेल्या निष्पाप नागरिकांच्या मनामध्ये भिती निर्माण केली जात आहे. काही गटांकडून जाणिवपूर्वक दहशत परसवली जात असताना पोलिसांवरही राजकीय दबाव वाढत चालला आहे. याला राजकीय वरदहस्त असून आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, हे सर्वसामान्य नागरिकांच्या मनावर बिंबवण्यासाठीच दहशतखोरांचा हा खटाटोप आहे. यावर सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळी मूग गिळून शांत बसले आहेत, असा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपचा उल्लेख न करता पत्रकारांशी बोलताना केला.
पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी वाकड, थेरगाव परिसरात रस्त्याच्या बाजुला लावलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. काही सोसायट्यांमध्ये वाहनतळात लावलेली चारचाकी वाहने फोडली. थेरगाव येथे दिवसाढवळ्या एक व्यक्ती लोखंडी हातोडीने वाहनांच्या काचा फोडत होता. सोमवारी मध्यरात्री संत तुकारामनगर येथील १५ वाहने फोडली. काही दिवसांपूर्वी निगडी प्राधिकरणात वाहनांची तोडफोड केली होती. काही ठिकाणी तर मोठ्या संख्येने दुचाकी वाहने जाळण्यात आली. अशा घटनांना आळा घालण्यासाठी परिमंडळ तीनच्या पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याशी पत्रव्यवहार केला. प्रत्यक्ष भेट घेऊनही चर्चा केली. मात्र, अशा घटनांना आळा बसलेला नाही. पोलीस जाणिवपूर्वक अशा घटना रोखण्यासाठी कारवाई करत नाहीत. कारण, पोलीस कारवाई करताना त्यांच्यावर राजकीय दबाव वाढत आहे. राजकीय विघातक शक्तींचा यामागे हात असल्यामुळेच असे प्रकार दिवसाढवळ्या पहायला मिळत आहेत. येवढे वाईट चित्र पिंपरी चिंचवडमध्ये यापूर्वी कधील पहायला मिळले नाही, अशी खंत खासदार बारणे यांनी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले शहरात अवैध धंदे फोफावले आहेत. धारदार शस्त्रअस्त्र घेऊन काही विघातक प्रवृत्ती खुलेआम फिरताना दिसत आहेत. दिवसाढवळ्या असे प्रकार घडत आहेत. तरी देखील पोलिसांकडून अशांवर कारवाई केली जात नाही. याचाच अर्थ पोलिसांवर राजकीय गुंडांचा दबाव आहे. पोलीस कारवाई करत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. चारचाकी वाहने चालवून पोटाची खळगी भरणाऱ्या नागरिकांची वाहने फोडली जात आहेत. कामावर जाऊन पै-पै जमा करून घेतलेली दुचाकी रात्रीत फोडली जात आहेत. असे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे नागरिक भयग्रस्त झाले आहेत. त्यांचे नुकसान भरून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सर्वसामान्य नागरिकांना भिती घालण्याचाच हा प्रकार असून त्याला राजश्रय मिळत आहे. राजकीय व्यक्तींकडूनच गुन्हेगारी वाढविण्याचे काम केले जात असल्यामुळे सर्वसामान्यांचे जीने मुश्कील झाले आहे. गुन्हेगारीला राजश्रय मिळणे ही चिंतेची बाब बनली आहे, अशी व्यथा बारणे यांनी व्यक्त केली.






















Join Our Whatsapp Group