पिंपरी (Pclive7.com):- अतिक्रमण कारवाई टाळण्यासाठी एका ३० वर्षीय महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपळेगुरव येथील देवकर पार्क येथे घडली.
देवीबाई राम पवार (वय-३०, रा. देवकर पार्क पिंपळे गुरव) असे आत्महत्या करणा-या महिलेचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाकडून पिंपळे गुरव परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. आज पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक सकाळी अकराच्या सुमारास देवकर पार्क येथील अनधिकृत घरांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. पालिकेचे अधिकारी पाहणी करत असताना आपल्या घरावरील कारवाई टाळण्यासाठी देवीबाई पवार यांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर औंध जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, संतप्त झालेल्या नागरिकांनी पोकलेन मशीन व जेसीबीवर दगडफेक केली. दगडफेकीनंतर परिसरातील कारवाईचे काम प्रशासनाने तातडीने थांबवले आहे. काही दिवसांपूर्वी पिंपळे गुरव येथील मोरया पार्क पाच मजली इमारतीवर कारवाई सुरु असताना एका रहिवाशाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आज ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.





















Join Our Whatsapp Group