पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणार्या शाळेच्या इमारतीसाठी राज्यसभा खासदार रेखा यांच्या खासदार निधीतून ३ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करून हा निधी घेण्यासंदर्भातील पत्र महापालिका आयुक्तांना प्राप्त झाले आहे. या निधीसाठी माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शाम लांडे यांनी पाठपुरावा केला आहे.
कासारवाडी येथील सर्व्हे क्रमांक ४२० येथील छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिराच्या आवारात पाच मजली प्रशस्त शाळा महापालिका बांधणार आहे. या शाळेच्या इमारतीसाठी १३ कोटी ७१ लाख ३२ हजार १९७ रुपये खर्च असून, त्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. दोन वर्षांत इमारत बांधली जाणार आहे. एकूण भूखंडाचे क्षेत्र ८ हजार ९११.३० चौरस मीटर आहे. सद्यःस्थितीत शाळेचे क्षेत्र तीन हजार ७८९.२१ चौरस मीटर आहे. दोन हजार ८६१.८१ चौरस मीटरमध्ये बांधकाम करण्यात येणार आहे.
इमारतीसाठी निधी मागण्यासाठी पत्र पाठविण्याची मागणी नगरसेवक शाम लांडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे ८ नोव्हेंबर २०१७ ला केली होती. त्याला खासदार रेखा यांनी प्रतिसाद देत जानेवारी २०१८ ला जिल्हा नियोजन समितीकडे पत्र पाठवून निधी वर्ग करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार तीन कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नुकताच वर्ग झाला आहे. सदर निधी महापालिकेने घ्यावा, असे पत्र जिल्हाधिकार्यांनी २४ जानेवारीला आयुक्त हर्डीकर यांना पाठविले आहे, अशी माहिती नगरसेवक शाम लांडे यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group