पिंपरी (Pclive7.com):- हाँगकाँगमधून चालणाऱ्या फसवणूकीच्या रॅकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला. सायबर सेलने सापळा रचून पाच बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांची फसवणूक करून मिळालेले चार कोटींहून अधिक रुपये क्रिप्टोकरन्सीद्वारे हाँगकाँग मधील आरोपीला पाठवल्याचे तपासात समोर आले आहे.
जुनेद मुख्तार कुरेशी (२१, रा. पुणे), सलमान मन्सूर शेख (२२, रा. लोहगाव रोड, पुणे), अब्दुल अजीज अन्सारी (२३, रा. लोहगाव रोड, पुणे), आकिफ अन्वर आरिफ अन्वर खान (२९, रा. पुणे), तौफिक गफ्फार शेख (२२, रा. लोहगाव रोड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसगाव येथील एका महिलेला इंस्टाग्रामवर शेअर मार्केट क्लासेस आणि शेअर मार्केट गुंतवणूक संदर्भात एक जाहिरात दिसली. महिलेला यामध्ये आवड असल्याने त्यांनी जाहीरातीच्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर महिलेला फिर्यादीला एका व्हाट्स अप ग्रुपला जॉईन करण्यात आले. इन्स्टिट्यूशनल डी मॅट अकाउंट काढण्यासाठी अनोळखी आरोपींनी एक फॉर्म पाठवला. त्यानंतर शेअर मार्केट मध्ये नव्याने येणाऱ्या कंपन्यांचे आयपीओ खरेदी करण्यासाठी फिर्यादीकडून आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यावर ३१ लाख ६० हजार रुपये घेतले.
फिर्यादी यांनी काही दिवसानंतर गुंतवलेली रक्कम परत मागितली असता ती रक्कम देण्यासाठी आरोपींनी चॅरिटी डोनेशन म्हणून आणखी चार लाख रुपये घेतले. गुन्ह्याचा तपास करताना बँक खात्यांचे सायबर सेलने तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार, बँक खाते हाताळणारे आरोपी निष्पन्न करून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून सात मोबाईल, पैसे मोजण्याची मशीन, आठ डेबिट कार्ड, १२ चेकबुक, पासबुक, सात लाख रुपये रोख रक्कम जप्त केली.
आरोपींकडे १२० बँक खात्यांचे तपशील आढळले..
अटक आरोपींकडे तब्बल १२० बँक खात्यांचे तपशील आढळून आले. त्या सर्व खात्यांवर आरोपींनी फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारणांमधील पैसे घेतले आहेत. बँक खात्यात पैसे आल्यानंतर आरोपी ते पैसे काढून घेत. त्यानंतर ते युएसडीटी या क्रिप्टोकरन्सी मार्फत हाँगकाँग या देशात पाठवत होते. आरोपींनी आत्तापर्यंत चार कोटी रुपयांहून अधिक पैसे हाँगकाँग येथे त्यांच्या म्होरक्याला क्रिप्टोच्या माध्यमातून पाठवल्याचे समोर आले आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे ७५ पेक्षा अधिक तक्रारींची नोंद आहे.