चिखली (Pclive7.com):- चिखली आकुर्डी रस्त्यावरील साने चौक ते स्पाईन रोड दरम्यानची दुकाने रात्रीच्या वेळी शटर उचकटून फोडली जात असल्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या पंधरा दिवसात तीसहून अधिक दुकानांचे शटर उचकटून दुकानातील रोख रक्कम व इतर साहित्य चोरीस जाण्याच्या घटनांत वाढ झाल्याने व्यापारी वर्ग भयभीत झाला आहे.
रात्रीच्या वेळी लोक दुकानांच्या आजूबाजूला मद्यधुंद अवस्थेत फिरत राहतात तर काही वेळा व्यापारी आणि ग्राहकांना दमदाटी करण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसात जवळपास तीसहून अधिक दुकानांचे शटर उचकटून चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये बहुतांशी व्यापाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याची माहिती देखील समोर आली आहे.
चोरांचा बंदोबस्त करावा..
या परिसरात चोरीच्या वाढत्या घटना व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांच्यासाठी चिंतेचा विषय ठरत असल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. पोलिस प्रशासनाने अशा घटनांवर अंकुश लावणे गरजेचे आहे. या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांची परिसरात धिंड काढण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे.
चिखली परिसरात चोरीच्या घटनेत चार व्यापाऱ्यांनी तक्रार दाखल केलेली आहे. आरोपींची माहिती मिळाली असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. या परिसरात साध्या वेषातील पोलिस व गस्त वाढवण्यात येत आहे. व्यापाऱ्यांनी घाबरून जाऊ नये, पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल.– विठ्ठल साळुंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली