चिंचवड (Pclive7.com):- सराईत गुन्हेगारांनी दुचाकीवरून चाललेल्या दोन तरुणांवर कारण नसताना कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेशनगर थेरगाव येथे घडली. बादल सलीम खान (१९, रा. कोयतेवस्ती, पुनावळे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी त्यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रेम शिंदे (१९, रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव) आणि क्रिश चौरू (१९, रा. लोंढेवस्ती, ताथवडे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी बादल आणि त्याचा मावस भाऊ आदिल सय्यद हे दोघेजण दुचाकीवरून काळाखडक येथून घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीची गाडी अडविली. लई माजला का रे, असे बोलून शिवीगाळ करीत आरोपी प्रेम शिंदे याने बादल याच्यावर कोयत्याने वार केले.
तर, आरोपी क्रिश चौरू याने आदिल याच्या डोक्यावर उलट्या कोयत्याने मारहाण करून जखमी केले. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर हत्याराचा धाक दाखवून लूटमारसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाकड पोलिस पुढील तपास करीत आहेत.























Join Our Whatsapp Group