पिंपरी (Pclive7.com):- मावळात पवना धरण क्षेत्रात काल पासून मुसळधार पाऊस बरसत आहे. पवना धरण सद्यस्थितीत ९९.७० टक्के भरलेले असून पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज दि.२४ रात्री ९ वाजता जलविद्युत केंद्रामधून विद्युतगृहाद्वारे १४०० आणि धरणाच्या सांडव्यावरून ४३२० क्युसेक्स असा एकूण मिळून ५७२० क्युसेक्स इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तरी नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा पवना धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीत ९९.७०% भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रामधून धरणामध्ये येणारा येवा विचारात घेता, धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता जलविद्युत केंद्रामधून विद्युतगृहाद्वारे १४०० क्युसेक्स व धरणाच्या सांडव्यावरून २१९० क्युसेक्स क्षमतेने नदीपात्रात विसर्ग चालू होता. पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार आज (दि.२४) रात्री ९ वाजता सांडव्याद्वारे होणा-या विसर्गामध्ये वाढ करून ४३२० क्यूसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. सांडव्यावरील विसर्गानंतर नदीपात्रामध्ये एकूण ५७२० क्यूसेक्स (१४०० + ४३२० = ५७२० क्यूसेक्स) इतका विसर्ग होणार आहे.
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे की, नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील सर्व नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास/प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.