पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत २० वर्षापूर्वी गावे समाविष्ट झाली होती. मात्र विकासापासून ही गावे वंचित होती. मी महापौर झाल्यानंतर वर्षभरात या समाविष्ट गावांच्या विकासावर भर दिला. आपल्या कारकीर्दीत या गावांना न्याय देऊ शकलो असल्याचे समाधान महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.
महापौर नितीन काळजे यांची १ वर्षाची कारकीर्द आज पूर्ण झाली. त्यानिमित्त कार्याचा आढावा देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महापौर काळजे म्हणाले की, २० वर्षापासून समाविष्ट गावांचा विकास खुंटला होता. मात्र महापौर पदाच्या माध्यमातून मी या गावांना खर्या अर्थाने न्याय देऊ शकलो. पालिकेने प्रथमच नव्याने समाविष्ट गावांसाठी रस्ते विकास धोरण राबविले, याअंतर्गत सुमारे ४२५ कोटीच्या ५० नव्या रस्तांना मंजूरी दिली. सभागृह चालवताना विरोधकांना बरोबर घेऊन काम केले. काम करताना आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. मात्र शहराचा विकास हाच उद्देश समोर ठेऊन काम केल्याचे काळजे म्हणाले. अजूनही भरपूर कीम करणे बाकी आहे. येत्या काळात रस्ते वाहतूक आणि पाणी पुरवठ्यावर जास्त भर देणार आहे.
आमदार महेश लांडगे हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी कधीच माझ्या कामात हस्तक्षेप केला नाही. कोणत्याही प्रकारचा त्यांचा रिमोट माझ्यावर नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले. महापौर पदाचा दिलेला राजीनामा हे कुठले नाट्य नव्हते. त्यावेळी मला जे योग्य वाटले तेच मी केले असेही ते म्हणाले.
वर्षभराच्या कारकीर्दीवर समाधानी असल्याचे सांगत महापौर काळजे म्हणाले की, महापौर पदाचा अडीच वर्षाचा कालावधी पुरेसा आहे. या काळात नक्कीच राहिलेली कामे पूर्ण करेल. या वर्षात शहरातील तब्बल अडीच हजार कार्यक्रमांना हजेरी लावली असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.





















Join Our Whatsapp Group