पिंपरी (Pclive7.com):- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या जागेची मागणी करणार आहेत. याबाबत माझे अजित पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. मला काम करण्याची सूचना त्यांनी केली आहे. त्यामुळे चिंचवड मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार असल्याचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी ABP Maza शी बोलताना सांगितले.
नाना काटे म्हणाले, चिंचवड मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला नाही. त्यावर कोणाची मक्तेदारी नसती. प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे फंडे वापरुन निवडून येण्याची यंत्रणा राबविली जाते. त्याला बालेकिल्ला म्हणता येणार नाही. चिंचवड मतदारसंघ भाजपला मिळाली तरी देखील मी निवडणूक लढविण्यावर ठाम आहे.
कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार याबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेणार आहे. माझ्यासमोर अनेक पर्याय आहेत. बाकीचे पक्ष आहेत. अजित पवार यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेईल. महाविकास आघाडीचाही पर्याय माझ्यासमोर असू शकतो. महायुतीच्या बैठकीत चिंचवडची जागा भाजपला सुटल्यास त्यावेळी माझी भूमिका जाहीर करेल असेही नाना काटे म्हणाले.