पिंपरी (Pclive7.com):- शुक्रवारी प्रदर्शित होणा-या ‘बबन’या मराठी चित्रपटात पिंपरी चिंचवड मधील जान्हवी कांबीकर या बालकलाकाराला छोटीसी भुमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ‘ख्वाडा’या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालेले दिग्दर्शक भाऊसाहेब क-हाडे यांचा ‘बबन’चित्रपट शुक्रवारी राज्यातील बहुतांश चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत व चित्राक्ष फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे बहुतांश शुटिंग रांजणगाव येथे झाले. कष्टकरी शेतक-यांच्या जीवनप्रवासावर आधारीत कथानक असलेल्या या चित्रपटात चिखली शरदनगर येथील अमृता विद्यालयात आठवी इयत्तेत असणारी जान्हवी कांबीकर हिने एमआयडीसीतील गरीब कामगार मुलीची भूमिका साकारली आहे. भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव हे मुख्य कलाकार आहेत. रांजणगाव येथे ३५ सेंटीग्रेड तापमानात भर उन्हात प्रथमच कॅमेरासमोर उभी राहिलेली जान्हवी म्हणाली मागील वर्षी बालेवाडी येथे या चित्रपटाच्या ऑडीशन्स झाल्या तेव्हा माझी ‘भाऊकाकांनी’ निवड केली. ज्याप्रमाणे आपण घरी आई वडीलांशी बोलतो अगदी तसेच चित्रपटातील संवाद माझ्याकडून भाऊकाकांनी वदवून घेतले. माझी भुमिका यात छोटीशी असली तरी प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी आहे. स्वप्निल पटेकर, नितीन वाघ हे देखील पिंपरी चिंचवड मधील कलाकार यात आहेत. कष्टकरी युवा शेतक-याच्या जीवनातील संघर्षमय वास्तव प्रवास आणि त्याला गुलाबी प्रेमाची झालर असे कथानक असलेल्या बबन चित्रपटातील स्थानिक कलाकारांचे काम पाहण्यासाठी प्रेक्षकांना शुक्रवारी २३ मार्चला चित्रपटगृहात जायला हवे असे ती म्हणाली.