भोसरीत महाविकास आघाडीचा आमदार करणार
पिंपरी (Pclive7.com):- नेहमी संभ्रमाचे राजकारण करणारे भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे हे नेमकी काय भूमिका घेणार याचा खुलासा स्वतः विलास लांडे यांनीच आज केला आहे. मी शरद पवार यांच्याच राष्ट्रवादीत आहे. विधानसभेसाठी मी इच्छुक नसून येणाऱ्या निवडणुकीत भोसरीतून महाविकास आघाडीचाच आमदार तयार करणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले आहे.
विलास लांडे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. लांडे म्हणाले की, लपून-छपून मी पवार साहेबांना कधीच भेटलो नाही. शरद पवार हे परिवार आहेत आणि पवार परिवाराशी आमचा १९८० सालापासून संबंध आहे. राजकारणात काही कमी जास्त होत असतं. शरद पवार साहेब म्हणजे देशातील एक मोठं नेतृत्व आहे. सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे आम्ही आजपर्यंत साहेबांसोबत राहिलो आहोत. आम्ही साहेबांना सोडून आम्ही जाऊ शकत नाही.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात आज पवार साहेबांची चर्चा झाली. शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी कोण उमेदवार असावेत त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली. महाविकास आघाडीमध्ये एक सूत्र आहे. त्यामुळे भोसरी विधानसभेची जागा ती आम्हालाच राहणार आहे. मी पहिल्यापासून पवार साहेबांसोबतच आहे. लोकसभा निवडणुकीत देखील मी खासदार अमोल कोल्हे यांचे काम केलं होतं. याबाबत मी अजित पवार यांना देखील सांगितलं होतं. मी लपून-छपून काहीच करत नाही, मी सांगून काम करतो. लोकसभा निवडणुकीत उमेदवार देताना अजितदादांनी घेतलेले निर्णय आम्हाला पटले नाहीत. आम्ही आज नाही तर १९८० सालापासून साहेबांसोबत आहोत.
लवकरच भोसरी विधानसभेत एक मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे, आणि स्वतः पवार साहेब उमेदवार जाहीर करणार आहेत. येत्या तीन-चार दिवसात उमेदवार जाहीर होतील. यापुढे मी स्वतः अधिकृतपणे महाविकास आघाडीचाच प्रचार करणार आहे. मी स्वतः इच्छुक नाही, मी आता आमदार तयार करणार आहे. भोसरी, खेड, मावळ, पिंपरी, जुन्नर, शिरूर येथील आमदार तयार करायचे आहेत असे विलास लांडे यांनी शेवटी बोलताना म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group