पिंपरी (Pclive7.com):- आळंदी येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत टोळीला पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. शनिवारी (दि.९) आदर्शनगर दिघी येथे ही कारवाई केली. यात दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अर्जुनसिंग सुरजितसिंग भादा (२२, रा. आदर्शनगर, दिघी), सोहेल अलिशेर मिर्झा (२२, रा. विश्रांतवाडी), रोमन दस्तगीर मुल्ला (२०, रा. चौधरी पार्क, मंगलमूर्ती रेसिडेन्सी जवळ, दिघी), आकाश सुधीर साळवी (२२, रा. गायकवाडनगर, दिघी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्याचे साथीदार बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (रा. दिघी), चेतन ऊर्फ चेप्या पांचाळ (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असताना खंडणीविरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकातील हवालदार प्रदीप पोटे व किरण जाधव यांना माहिती मिळाली की, शिव कॉलनीच्या रस्त्यावर आदर्शनगर, दिघी येथे टोळके दरोड्याच्या तयारीत आहे. तसेच त्यांच्याकडे घातक हत्यारे आहेत. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लोखंडी कोयते, लोखंडी पालघन, लायटर पिस्तूल, नायलॉन दोरी, मिर्ची पावडर पुडा, सहा मोबाइल, दोन दुचाकी व एक स्क्व ड्रायव्हर असा एकूण २ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी चौकशी केली असता आळंदी ते मोशी रस्त्यावरील पेट्रोल पंपावर ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. संशयितांवर दरोडा, दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, वाहन चोरी, दहशत माजविणे, गंभीर दुखापत करणे, अवैध शस्त्र बाळगणे, घरफोडी, अमली पदार्थ विक्री करणे व वाहनांची तोडफोड असे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ बाळासाहेब कोपनर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१ डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक सुनिल भदाणे, पोलीस अंमलदार प्रदीप पोटे, किरण जाधव, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, किरण काटकर, मंगेश जाधव, सुनिल कानगुडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार नागेश माळी व पोपट हुलगे यांचे पथकाने केली आहे.






















Join Our Whatsapp Group