पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राजकीय वरदहस्तामुळेच खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. ज्या पोलीसांनी यावर वचक ठेवला पाहिजे तेच गुन्हेगारांचे पोशिंदे झालेत. शहरातील पोलीस चौक्या हप्ते वसूलीचे केंद्र बनल्या असल्याचा खळबळजनक आरोप मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
पिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेत्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बारणे बोलत होते. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, गटनेते राहुल कलाटे, शहर संघटिका सुलभा उबाळे, भगवान वाल्हेकर, जितेंद्र ननावरे, नगरसेवक सचिन भोसले, मिनल यादव आदी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले की, सरकारच्या वतीने नुकतीच पिंपरी चिंचवडच्या स्वतंत्र आयुक्तायलाची घोषणा झाली, मात्र लवकरात लवकर यावर अंमलबजावणी व्हायला हवी. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच शहरात गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. राजकीय वरदहस्त असलेले गुन्हेगार शहरात मोकाटपणे फिरत आहेत. पोलीस चौक्यांमध्ये गुन्हेगारांचा हस्तक्षेप वाढला आहे. अवैध धंद्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राजरोसपणे गुन्हेगार मोकाटपणे फिरत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही महिन्यात तर वाहनांच्या तोडफोडीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते असले तरी शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. सामान्य माणूस एखादी तक्रार घेऊन पोलीस चौकीत जायला घाबरत आहे. कारण तक्रार द्यायला गेलेल्या नागरिकावरच खोटी उलट तक्रार पोलीस त्याच्यावर टाकतात. पोलीस खाते राजकीय दबावात काम करत आहे. वाढती गुन्हेगारी ही भविष्यात मोठा चिंतेचा विषय बनलाय. अशीच परिस्थीती राहिली तर येत्या काळात नगर प्रमाणे एखादी घटना घडण्याची भिती निर्माण झाली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे उद्या दि.१० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे खासदार बारणे शेवटी बोलताना म्हणाले.






















Join Our Whatsapp Group