पिंपरी (Pclive7.com):- अहमदनगरमधील केडगाव येथे शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येचा रहाटणी, काळेवाडी शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ पडकून कडक शासन करावे, अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
केडगाव येथील सुवर्णनगर येथे शनिवारी (दि.७) रात्री भर चौकात राजकीय वैमनस्यातून संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली. संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. त्यावेळी हल्लेखोरांनी रिव्हॉलव्हरमधून गोळीबार करून कोयत्याने वार करून दोघांची हत्या केली. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले या तीन आमदारांसह ३० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना रहाटणी काळेवाडी शिवसेना प्रभाग प्रमुख युवराज दाखले म्हणाले की, घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालायला हवे. राज्यातील राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेले आहे. एकमेकांवर कुरघोड्या करता-करता आता एकमेकांच्या जीवावर उठलेल्या नेत्यांवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर प्रशासनाने आळा घातला पाहिजे, अशी मागणी शिवसेना राज्य कार्यकारणीच्या वतीने करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group