हिंजवडी (Pclive7.com):- गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटात फूट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेत नवा ‘उदय’ होणार, असे विधान याआधी केले होते. आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी याबाबत भाष्य केले आहे. भारतीय जनता पक्षाला देशभरात पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. यांच्या तोंडाला रक्त लागले आहे. जोपर्यंत ही चटक आहे, तोपर्यंत फोडाफोडीचं राजकारण सुरू राहिल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये आज बैठक आहे. मागील निवडणुकीतील पराभवाला खचून न जाता महानगरपालिका लढणार आहोत. स्वबळाचा नारा दिला म्हणजे महाविकास आघाडी तुटली किंवा संपली असा अर्थ निघू शकत नाही. मुंबईपुरता स्वबळाचा नारा आहे. आमच्या पक्षाचा तिथे पगडा आहे. आमची पकड आहे, कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, स्वबळावर लढावं. स्वबळावर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात लढणार याबाबत शंका आहे. तर इतर शहरात एकत्र लढावं, असं तिन्ही पक्षांचं म्हणणं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
संजय राऊत पुढे म्हणाले की, शिंदे गटात उदय होणार आहे. ज्या पद्धतीने मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना फोडण्यात आली. त्याप्रमाणे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष फोडला जाईल. भारतीय जनता पक्षाला देशभरात पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. फक्त इथे नाही, चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचा पक्ष देखील तोडला जाईल. यांच्या तोंडाला रक्त लागलं आहे. जोपर्यंत ही चटक आहे, तोपर्यंत फोडाफोडीचं राजकारण सुरु राहणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.






















Join Our Whatsapp Group