पिंपरी (Pclive7.com):- वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व लोकमान्य हॉस्पिटलचा संयुक्तीकपणे २९ व्या रक्षा सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत अपघातग्रस्तांना मदत करणार्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना ‘अपघातमित्र’ हे ओळखपत्र व सन्मानपत्र देण्यासाठी आयोजित कार्यक्रम लोकमान्य हॉस्पिटल, निगडी येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी आमदार गौतम चाबुकस्वार, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, वाहतूक पोलीस आयुक्त राजेंद्र आंबरे, पोलीस आयुक्त सतीश पाटील, निगडी पोलीस निरिक्षक विजय पळसुले, महामार्ग पोलीस निरीक्षक हागवणे, परिवहन अधिकारी विधाते, पोलीस निरिक्षक पवार, लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. सोनाली लोहकरे, ट्रॉमा विभाग प्रमुख डॉ. आशिष सूर्यवंशी, डॉ. श्रीकृष्ण जोशी, सुनील काळे उपस्थित होते.
नागरिकांनी संवेदशील होऊन अपघातग्रस्तांना मदत करावी, रिक्षा चालकांनी यात महत्वाची कामगिरी बजवावी व सर्वानी वाढत्या वाहनाबरोबरच वाहन जबाबदारी चालवून सुरक्षित राहण्याचे भान ठेवावे. पिंपरी कॅम्पमधील वाहतुकीची स्थिती पाहून लोकप्रतिनिधींच्या मदतीने प्रशासकीय अधिकाऱ्याची योजना आखून नियोजन करावे. दुचाकी चालकांनी मेंदूचे अवयव प्रत्यारोपण अजून होत नसल्याने प्राणाचे महत्व जाणून हेल्मेट वापरावे व लोकमान्य हॉस्पिटलसारख्या संस्थेच्या सामाजिक जाणीव प्रकल्पाला हातभार लावा व ‘अपघातमित्र’ हि शहरभर चळवळ करावी असे आव्हान आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. उन्हातान्हात काम करणाऱ्या पोलिसांचेही त्यांनी प्रचंड कौतुक केले.
रस्त्यावरील फर्स्ट रेस्पॉडर म्हणून कार्यरत राहणाऱ्या रिक्षा चालकांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून आयुष्यभर प्रवाहाची सेवा करणाऱ्या जेष्ठ रिक्षाचालकांना तसेच नागरिकांना सन्मानाची सौजन्याची वागणूक देणे हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य असून त्यासाठी पोलिसांच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. डॉक्टर व पोलीस, सामाजिक संस्थेबरोबर एकत्र येऊन काम करतात हे सुजाण समाजाचे लक्षण आहे. पोलीस हा सुद्धा माणूस असून तो अत्यंत संवेदनशील असतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा आदेशांनी नागरिकांनी प्रथम अपघातग्रस्तांना मदत करावी त्यामध्ये पोलीस आपणास कोणतीही चौकशी न करता सहकार्य करतील हे आश्वासनही दिले.
अपघातामध्ये आपल्या देशात सर्वाधिक बळी हे पदचाऱ्यांचे जातात. लोकांना चालावे कसे हेही माहित नाही. त्यापाठोपाठ दुचाकी वाहनचालक हे हेल्मेट वापरण्यास तयार नाहीत हे दुर्दैव असून दुचाकी वाहनचालकांचा मृत्यू हेही अत्यंत घातक आहे. तसेच वाहनचालकांचा वेगावरील बेजबाबदारपणा याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून रास्ता सुरक्षा ही चळवळ निर्माण व्हायला हवी असे मत उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांनी व्यक्त केले.
लोकमान्य हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्र वैद्य यांनी ‘अपघातमित्र’ या संकल्पनेद्वारे हॉटेलवरील कर्मचारी, ढाबाचालक, रिक्षाचालक, ड्रायव्हर, पोलिसमित्र संघटना यातील ५००० हुन अधिक नागरिकांना शालीय प्रशिक्षण देवून अपघातग्रस्तांना मदतीचे प्रशिक्षण दिले आहे. दीड लाखाहून अधिक अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्याबरोबरच लोकांमध्ये अपघातग्रस्तांना मदतीची संवेदना जागृत करण्याचे काम अहोरात्र सुरु आहे. या उपक्रमाद्वारे डॉ. आशिष सूर्यवंशीच्या मदतीने ‘प्रशिक्षण माँडयुल’ तयार केले असून प्रशिक्षण प्रयोगशाळा तयार केलेली आहे. अशी माहिती कार्यकारी सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी दिली. याप्रसंगी महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी अपघातग्रस्तांना शास्त्रीय पद्धतीने मदत करून ज्यांनी प्राण वाचविले असे पो. कॉन्स्टेबल ओझरकर, दुबे, कदम, मोरे, सौ, भांगे, श्री. बागडे, गायकवाड, दत्तात्रय राऊत, प्रशांत सोळेकर, पोलीस मित्र संघटनेचे अनिल पालकर, अशोक तनपुरे, सौ, किशोरी हरणे, संजय प्रधान, उत्तम सादळकर, रमेश ओतारी, लक्ष्मण शिंदे, सुधीर जमदाडे, राजेंद्र थिटे, सुनील शहापुरे व रिक्षा चालक जेकब मॅथ्यु , नारायण लोखंडे, उमेश उदमले, संतोष कांबळे, गजानन शेरेकर जॉनी मॅथ्यु, गणेश कुंभार, अँथनी पंडित यांचा सन्मान करण्यात आला.






















Join Our Whatsapp Group