पिंपरी (Pclive7.com):- मुळशी तालुक्यातील भुकूम येथील स्काय आय मानस लेक सिटीमधील आयरिस-3 सोसायटीच्या आवारात लिफ्टबाहेर पाकिस्तानी चलनातील नोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही सोसायटी नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) च्या हद्दीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर प्रकार मानला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलीस स्टेशन हद्दीत भुकुम गावात मानस लेक सोसायटीच्या सर्विस लिफ्ट जवळ दि.८ फेब्रुवारी २०२५ रोजी पाकिस्तानी चलनातील २० रुपयेची नोट सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांना मिळून आली. त्यानंतर त्यांनी तक्रार अर्जासोबत पोलीस स्टेशन येथे ती नोट जमा केली. सदरची नोट मानस सोसायटी येथे कशी आली याबाबत पोलिसांनी तपास चालू केलेला आहे. सोसायटीमध्ये एकूण ८४ फ्लॅट धारक राहत असून दोन लिफ्ट आहेत. लिफ्टच्या बाजूला कॅमेरा असून सदरचा कॅमेरा नोव्हेंबर २४ पासून बंद आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सोसायटी तसेच ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच ही नोट नेमकी कोणी आणि कशासाठी येथे आणली याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेण्याची मागणीही स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.





















Join Our Whatsapp Group