चिंचवड मतदारसंघात वीजपुरवठा सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे थेरगाव आणि पिंपळे गुरव-भाऊनगर परिसरातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी नवीन विद्युत रोहित्र बसविणे आणि विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

थेरगाव येथील मंगलनगर प्रेरणा शाळा रोड, अजिंक्यतारा कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी या भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येच्या निराकरणासाठी DPDC योजनेअंतर्गत 14 लाख 72 हजार 185 रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली आहे. लवकरच प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर नवीन विद्युत रोहित्र बसविण्याचे काम सुरू होणार आहे.

तसेच, पिंपळे गुरव आणि भाऊनगर परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. या कामासाठी 3 लाख 58 हजार 714 रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले असून, महावितरणच्या ठेकेदारामार्फत हे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या कामांमुळे संबंधित भागांतील नागरिकांना अखंडित आणि सुरक्षित वीजपुरवठा मिळण्यास मदत होईल. आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाली असून, लवकरच कार्यवाहीला गती मिळणार आहे.





















Join Our Whatsapp Group