पिंपरी (Pclive7.com):- चिखली येथील कुदळवाडी परिसरात आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामे व पत्राशेडवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने शनिवार (दि.८) पासून धडक कारवाई सुरू केली. ती कारवाई शुक्रवार (दि.१४) पर्यंत सलग सात दिवस सुरू होती. या करवाई मोहिमेत तब्बल ८२५ एकर जागा रिकामी करण्यात आली असून, तब्बल ४ हजार १११ भंगार गोदामे, लघुउद्योग व इतर आस्थापना भूईसपाट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा निर्मनुष्य परिसर भयान दिसत आहे. ही कारवाई स्थगित करण्यात आली आहे.
पहाटे पाच वाजल्यापासून महापालिका व पोलिस विभागांची यंत्रणा एकत्रित येऊन ही कारवाई मोहीम सक्तीने राबवित होती. जेसीबी, पोकलेन, क्रेन, कटरच्या सहाय्याने अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदाम, दुकाने आणि पत्र-ाशेड तोडण्यात आले. पहिल्या दिवशी खरबदारी म्हणून त्या भागांतील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली होती. तेथील प्रमुख व्यावसायिक व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

व्यावसायिक, लघुउद्योजक, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, मंत्री, पदाधिकारी व माजी नगरसेवकांचा दबाव झुगारून ही कारवाई सलग सात दिवस करण्यात आली. त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र पथकच तयार केले होते. आवश्यक यंत्रसामग्रीसह मोठा पोलिस बंदोबस्तात पार पडली. पहाटे पाचला सुरू होणारी कारवाई सायंकाळी सहाला थांबविली जात होती. या कारवाईत तब्बल ४ हजार १११ आस्थापना पाडण्यात आल्या. त्यात एकूण ८२५ एकरचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे. रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या जागेत डांबरीकरण करण्यात येत असून, इतर सेवा व सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.























Join Our Whatsapp Group