पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपाने कोणतेही ठोस काम केले नाही. केवळ जनतेच्या पैशाची लूट झाली आहे. आयुक्त हे भाजपचे प्रवक्ते आहेत. पालिकेतील प्रत्येक भ्रष्टाचारात आयुक्त सहभागी झालेत. स्थायी सभापती, महापौर, भाजप पदाधिकाऱ्यांचे ‘खिसे’ भरून देण्याचे काम आयुक्तांनी केले आहे. त्यासाठीच नागपूरहून त्यांना पिंपरीत आणले असल्याचा खळबळजनक आरोप दत्ता साने यांनी केला आहे. हे सर्व भ्रष्टाचार आता पुराव्यानीशी आपण बाहेर काढणार असल्याचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत जाहिर केले.
पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. साने यांनी विरोधी पक्षनेतेपदाची सुत्रे स्विकारली, त्यानिमित्त त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक डब्बू आसवानी, समीर मासूळकर, राहुल भोसले, पंकज भालेकर, नगरसेविका वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, माई काटे, सुमन पवळे, विनया तापकीर, अनुराधा गोफणे, संगीता ताम्हाणे, निकीता कदम, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.
दत्ता साने म्हणाले की, एक वर्षापूर्वी पिंपरी महापालिकेत भाजपाची सत्ता आली. त्यांनी कशाप्रकारे कारभार केलाय ते संपूर्ण शहराने पाहिलयं. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या माध्यमातून शहराचा केलेला विकास आणि भाजपाने केलेली कामे यात मोठा फरक दिसून येतोय. विकासा ऐंवजी स्वत:ची घरे भरण्याचा भाजप पदाधिकार्यांचा मानस आहे. त्यांच्या या कारभाराविरोधात आवाज उठविण्याची जबाबदारी मी चोखपणे बजावणार आहे. गेल्या वर्षभरातील फोफावलेला भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. शहरात पाणी तसेच कचर्याचा प्रश्न मोठा गंभीर बनत चाललायं. कुठल्याच प्रभागात विकास कामे झालेली दिसत नाहीत. वर्षाचे बजेट नेमके गेले कुठे हा मोठा प्रश्न आहे.
पुढे ते म्हणाले की, समाविष्ट गावात जागा ताब्यात नसतानाही निविदा काढण्यात आल्यात. शवदाहिनीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीला बदनाम केले होते. मात्र आता त्याच ठेकेदाराकडून जादा दराने शवदाहिनी बसविण्याचा घाट घातला जात आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांना ‘दमदाटी’ करून चुकीची कामे करायला लावली होती. आता राष्ट्रवादी त्या अधिकार्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे. आयुक्त हे भाजपचे प्रवक्ते आहेत. पालिकेतील प्रत्येक भ्रष्टाचारात आयुक्त सहभागी झालेत. स्थायी सभापती, महापौर, भाजपाचे नेते यांचे खिसे भरून देण्याचे काम आयुक्तांनी केले आहे. त्यासाठीच नागपूरहून त्यांना पिंपरीत आणले असल्याचा खळबळजनक आरोप दत्ता साने यांनी केला आहे.