चिंचवड (Pclive7.com):- चिंचवडगाव येथील मोरया गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने किल्ले वासोटा हा ट्रेक दि.१२ एप्रिल रोजी करण्यात आला होता. सदर ट्रेकला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला. या ट्रेकला एकूण ५० जणांनी सहभाग नोंदवला. या ट्रेकचे नियोजन मोरया गिरीभ्रमण संस्थेचे सदस्य गौरव जोशी, अजय खोल्लम, स्वानंद मोकाशी, ओंकार मोकाशी, समीर वरेकर, प्रणव चिंचवडे यांनी यशस्वीपणे केले. त्यांना संस्थेचे ज्येष्ठ सभासद चिंतामणी बावळे, तुषार टोणपे, संजय चिंचवडे, श्रीकांत देव, श्रीकृष्ण कडूसकर, दिपक कदम व श्री.बाजी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

या ट्रेकमध्ये वय वर्षे ३ ते ७५ पर्यंतच्या लोकांनी सहभाग घेतला ही उल्लेखनीय बाब आहे. विशेष म्हणजे अतिशय कमी वय वर्षे ३ असलेल्या कुमार वेदेश याने हा ट्रेक पूर्ण केला. तसेच श्री. बावळे यांनी दाखवून दिले की, वयाचा आणि तंदुरुस्तीचा काही संबंध नाही. ७५ व्या वर्षी देखील वासोटा सारखा अवघड ट्रेक करणे शक्य आहे. सदर ट्रेक पूर्ण करताना सध्याचे ऊन कसोटी पाहणारे होते. तसेच दुपारी ३ नंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दोन्ही ऋतू बदल अनुभवायला मिळाले. अशा परिस्थितीत सुद्धा सर्व ५० जणांनी हा ट्रेक पूर्ण केला.

कुमार वेदेश
मोरया गिरीभ्रमण संस्था ही महाराष्ट्रातील अग्रगण्य अशी गिर्यारोहण संस्था आहे. संस्थेमार्फत अनेक उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात. गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ संस्थेमार्फत सह्याद्रीच्या डोंगररांगातून विविध ट्रेक, तसेच रॉक क्लाइंबिंग अँक्टिव्हिटीचे आयोजन करण्यात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संस्थेमार्फत आतापर्यंत २५ हून जास्त बेसिक रॉक क्लाइंबिंग कोर्स आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये १००० पेक्षा जास्त मुलांना रॉक क्लाइंबिंगचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.