सांगवी (Pclive7.com):- पिंपळे गुरवचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाची विविध कार्यक्रमांनी व कुस्तीच्या आखाड्याने सांगता रविवारी झाली. ग्रामदैवत श्री भैरवनाथ उत्सवानिमित्त उत्सव समितीचे अध्यक्ष व आमदार शंकर जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी यांच्या नियोजनाखाली उत्सवाच्या अखेरच्या दिवशी भव्य कुस्त्यांचा आखाडा पार पडला. यावेळी आमदार शंकर जगताप माजी नगरसेवक शशिकांत कदम, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, सागर आंगोळकर, माजी स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, राजेंद्र जगताप यांच्यासह उत्सव कमिटी पदाधिकारी, सदस्य व कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्या क्रमांकाची कुस्ती सिकंदर शेख व हरियाणा केसरी अभिषेक कुमार यांच्यात झाली. यामध्ये सिकंदरने अभिषेकवर मात करत चांदीची गदा व दीड लाखाचे बक्षीस पटकावले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती साकेत यादव (पुणे) विरुद्ध विकास दहिया (हरियाणा) यांच्यात झाली. या कुस्तीत साकेत यादव विजेता ठरला. अनिकेत मांगडे व आकाश रानवडे यांच्यात तिसऱ्या क्रमांकाची अटीतटीची कुस्ती झाली. अनिकेतने आकाशचा पराभव करून ही कुस्ती जिंकली.
यावेळी पैलवांनाच्या अन्य ३५ कुस्त्या लावण्यात आल्या. सर्व विजेत्या व उप पहिलवानांचा उपस्थित मान्यवरांकडून वैयक्तिक बक्षीसे देऊनही सन्मानित करण्यात आले. कुस्तीसाठी पंच म्हणून माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, दत्ता कंद, अर्जुन शिंदे यांनी काम पाहिले. बाबा लिमण यांनी समालोचन केले.