पिंपरी (Pclive7.com):- माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने आयोजित प्रभाग क्रमांक २१ व पिंपरी परिसरातील १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब,व स्कूल बॅग तसेच शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास करिअर मार्गदर्शनासाठी विवेक वेलणकर यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना करिअर निवडीसंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. “गुणवत्ता ही परीक्षेपुरती मर्यादित नसून, ती तुमच्या विचारात आणि कृतीत दिसली पाहिजे. योग्य करिअर निवड ही यशस्वी आयुष्याची पहिली पायरी आहे, त्यामुळे स्वप्न मोठी ठेवा आणि त्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. “यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वअनुशासन, ध्येय निश्चिती, सातत्य आणि सकारात्मक विचारसरणी यांचे महत्त्व सांगितले. “यश हे अपघाताने मिळत नाही, ते नियोजन, प्रयत्न आणि योग्य दृष्टिकोनातून घडवावे लागते,” असे ते म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संदीप वाघेरे म्हणाले कि, “यश हे नशिबावर नाही, तर प्रयत्नांवर अवलंबून असतं.”ही उक्ती आपल्या परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांनी खरं करून दाखवली आहे. शिक्षण आणि विद्यार्थी हे समाजाचे भविष्य आहेत म्हणूनच आजचा हा सत्कार समारंभ म्हणजे सन्मान आहे त्या मूल्यांचा –जे आपल्याला घडवतात, शिकवतात आणि पुढे जाण्याची दिशा देतात.आपल्या भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा, योग्य मार्गदर्शन आणि हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी माझे प्रयत्न नेहमी असेच राहतील. आज आपण इथे ज्यांचा सत्कार करतो आहोत, ते उद्या आपले डॉक्टर, अभियंते, प्रशासन अधिकारी, उद्योजक किंवा वैज्ञानिक बनतील – आणि देशाच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावतील अशी आशा व्यक्त करतो.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक व स्थानिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. संदीप वाघेरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि असे उपक्रम सातत्याने राबविण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष माजी अण्णा बनसोडे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, तसेच माजी नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे व मोरेश्वर शेडगे, पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, सुभाष वाघेरे, शांताराम सातव, रामभाऊ कुदळे, वसंत तावरे, सुधाकर यादव आदी मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन युवा मंचचे अध्यक्ष हरीश वाघेरे, चंद्रशेखर अहिरराव, गणेश मंजाळ, विठ्ठल जाधव, किरण शिंदे, शुभम मिटकरी, विक्की नाईक, मयूर कचरे, रंजना जाधव, समीक्षा चिकणे, प्रीती साळे यांनी केले.