चिखली (Pclive7.com):- पती- पत्नीचे नातं सात जन्म टिकावे यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला सुवासिनींनी वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले. यानिमित्त चिखली येथील महात्मा फुलेनगरमधील श्री गणेश मंदिराच्या प्रांगणात मोठ्या वटवृक्षाखाली सुवासिनींची गर्दी झाली होती.

आख्यायिकेनुसार सत्यवान आणि सावित्री या दाम्पत्याच्या आयुष्यात आलेला एक दिवस म्हणून वटपौर्णिमा आधुनिक युगातही तितक्याच पारंपरिक पद्धतीने साजरा केली जात आहे. हिंदू धर्मातील सण, प्रथा, परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडल्या गेल्या आहेत. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी मनोभावे सौभाग्यवतींनी पूजा केली.

सौभाग्याचे लेणं लेवून मिळेल तिथे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी पोहोचल्या. सुवासिनींनी बाजारातून वडाची फांदी आणून घरीच किंवा अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये, मोकळ्या पटांगणात पूजा न करता परंपरेनुसार वडाच्या झाडाला सुवासिनींनी सात फेरे मारीत धागा बांधावा व आपण दरवर्षी एक वडाचे झाड लावून त्याचे संवर्धन करावे असे सामाजिक कार्यकर्ते यशवंत कन्हेरे यांनी सांगितले. त्यानंतर तिथे उपस्थित ब्राह्मणांना दान-दक्षिणा देत इतर सुवासिनींनी सौभाग्याचे लेणे हळद-कुंकू लावून, आंब्यांचे वाण देऊन ओट्या भरल्या.

वटपौर्णिमेनिमित्त महिलांकडून एकमेकींना शुभेच्छाही दिल्या जात होत्या. सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यानातील भल्यामोठ्या डेरेदार वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला वर्गाची झुंबड उडाली होती. त्या ठिकाणी उत्सवाचे रूप आले होते. मंदिराच्या ठिकाणी केळी, सफरचंद, आंबा, जांभूळ आदी वटपौर्णिमेच्या पूजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत पतीसह महिलांची गर्दी होती. परिसरात दुपारपर्यंत वडाची पूजा आटोपल्यानंतर घराघरात जाऊन वाण देण्यासाठी महिलांची धावपळ सुरू होती.

वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे वाटप..
सौ. किर्तीताई मारुती जाधव युथ फाऊंडेशन व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांनी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केलं होतं. झाडे लावा झाडे जगवा.. झाडे लावा पर्यावरण वाचवा..! वटपौर्णिमेनिमित्त सर्व महिलांना ऑक्सीजन निर्मितीसाठी वडांची रोपे लावा असे संदेश वडांची रोपे देऊन देण्यात आले.
वटपौर्णिमेच्या दिवशी चोरीचे प्रमाण अधिक असते त्यामुळे चिखली पोलीस स्टेशनचे निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी उपस्थित महिला भगिनींना दागिन्याचे संरक्षण करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रसंगी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शिवानंद चौगुले, यशवंत कन्हेरे, मारुती जाधव, पांडुरंग पिंगळे कीर्तीताई जाधव आदी महिला भगिनींच्या सुरक्षेसाठी तैनात होते.