पिंपरी (Pclive7.com):- निगडी ते पिंपरी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. आज दुपारी आकुर्डी दत्तवाडी येथील शाळेची विद्यार्थिनी नंदिता तरळ ही निगडी येथील मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणचा पत्रा अंगावर पडल्याने जखमी झाली आहे.
आकुर्डी दत्तवाडी येथील शाळेची विद्यार्थिनी नंदिता तरळ ही आज विशाल ज्वेलर्स, मधुकर पवळे उड्डाणपूल खालील मेट्रो रेल्वेच्या कंपाऊंडसाठी लावलेल्या लोखंडी पत्र्या अंगावर पडून जखमी झाली. तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे मेट्रो अधिकाऱ्यांच्या कामातील हलगर्जीपणा समोर आला असून, पिंपरी-चिंचवड भाजप सरचिटणीस सचिन काळभोर यांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पालखी सोहळा कालावधीत मेट्रोच्या कामाला स्थगिती देण्याची होती मागणी
आज दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी हा अपघात घडला. विशेष म्हणजे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शहरातून मार्गस्थ होत असताना, पालखी सोहळ्याच्या निमित्ताने निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम स्थगित करावे, अशी मागणी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली होती. मात्र, या मागणीची दखल घेण्यात आली नाही. परिणामी, आज लोकमान्य टिळक रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली आणि शाळेची विद्यार्थिनी नंदिता तरळ जखमी झाली.
या घटनेमुळे, वारंवार होणाऱ्या अशा घटनांबद्दल मेट्रो अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. मेट्रोचे काम सुरक्षिततेच्या नियमांनुसार होत नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.