पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील पुढचे पाऊल टाकत पिंपरी विधानसभेच्या आखाड्यात उडी ‘एन्ट्री’ केली आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या या शक्ति प्रदर्शनामुळे पिंपरी विधानसभा मतदार संघातील इच्छूकांची संख्या वाढली असली, तरी देखील ओव्हाळ यांच्या रुपाने आणखी एक तगडा उमेदवार विधानसभेकरिता रिंगणात उतरणार असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.
पुनावळे भागातील एक सक्षम राजकीय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकपदी निवडून येत, ओव्हाळ यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. या पाच वर्षाच्या कारकिर्दीत त्यांना ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीतून त्यांनी महापालिका अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होत, त्यावरील आपले मत मांडले. याशिवाय पुनावळ्यात प्रस्तावित असलेल्या कचरा डेपोविरोधात आंदोलन केल्याने ते प्रकाश झोतात आले. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असतानाही त्यांनी पुनावळ्यातून कचरा डेपो बाहेर हटवण्यासाठी प्रयत्न केले. याशिवाय त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पुनावळे भागातील विविध नागरी समस्या सोडविल्या गेल्या. पुनावळे गावच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
विधानसभा निवडणुकीला आठ ते नऊ महिन्यांच्या कालावधी बाकी आहे. शहरातील चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणुकीसाठी मर्यादित राजकीय चुरस असताना, पिंपरी विधानसभेकरिता मात्र, प्रत्येक राजकीय पक्षाकडून अनेक जण इच्छुक आहेत. या निवडणुकीत सेना-भाजपची युती न झाल्यास, या मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांचा अपवाद वगळत, काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीचे संकेत दिल्याने, हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येत आहे. याशिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पक्ष असे अनेक राजकीय पक्ष विधानसभेच्या आखाड्यात आपले उमेदवार उतरविणार आहेत. त्यात आता शेखर ओव्हाळ देखील उडी घेणार आहेत. डिबीएन विकास संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तरुणांची फौज पिंपरी विधानसभेत कामाला लावली आहे. शेखर ओव्हाळ हे भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. पिंपरी विधानसभा मतदार संघातील इच्छुकांमध्ये त्यांचीही ‘एन्ट्री’ झाल्याने चुरस वाढली आहे.
महापालिकेनंतर थेट विधानसभा लक्ष्य
लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, विलास लांडे, अण्णा बनसोडे, अँड. गौतम चाबुकस्वार यांची महापालिकेतील राजकीय नगरसेवक पदाने सुरु झाली. या पाचही जणांना थेट विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. तर श्रीरंग बारणे यांनाही नगरसेवक ते थेट मावळ लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आता पिंपरी मतदार संघातून माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ हे देखील आपले नशिब आजमावून पाहण्याच्या तयारीत आहेत. विविध राजकीय पक्ष प्रमुखांशी जिव्हाळ्याचे संबंध ही ओव्हाळ यांची जमेची बाजू आहे.





















Join Our Whatsapp Group