पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील निहाल नाणेकर याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली नसून त्याच्यावर मित्रांनीच गोळ्या झाडल्या आहेत. ही बाब पोलीस तपासात समोर आली असून त्यानुसार कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, निहाल याने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव त्याच्या दोन मित्रांनी रचला होता. हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीसांनी सांगितले.
निहालचे वडील पांडुरंग सहदेव नाणेकर (रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विकी घोलप आणि संकेत साटणकर (दोघे रा. चिंचवड) यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निहाल त्याच्या विकी आणि संकेत या दोन मित्रांसोबत रविवारी (दि. १०) रात्री साडेआठच्या सुमारास कामशेत येथील राजवाडा हॉटेलमध्ये आला होता. त्यांनी हॉटेलमध्ये खाण्यासाठी भजी मागवली. दरम्यान, निहालला आकाश लांडगे याच्या एका नातेवाईकाचा फोन आला. त्यानंतर गोळी झाडल्याचा आवाज झाला. हॉटेल कर्मचारी निहाल बसलेल्या टेबलकडे धावले असता, त्यांना निहाल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याची माहिती निहालच्या मित्रांकडून मिळाली. मात्र निहालला लागलेली गोळी ही मारून घेतली नसून ती मारल्याचे तपासात समोर आले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून विकी आणि संकेत या दोघांना कामशेत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निहाल कुठल्याही तणावात नव्हता. तसेच कुठल्याही तणावातून तो आत्महत्या करू शकणार नव्हता, अशी माहिती नेहालचे वडील पांडुरंग यांनी पोलिसांना दिली आहे.
असा रचला होता बनाव
निहालने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा बनाव त्याचे मित्र विकी आणि संकेत यांनी रचला. त्यांनी सुरुवातीला पोलिसांना माहिती दिली की, निहाल आणि आम्ही रविवारी सुट्टीनिमित्त लोणावळ्याला गेलो होतो. रात्री लोणावळ्याहून परतत असताना साडेआठच्या सुमारास कामशेत येथे आलो असता पाऊस सुरु झाला. त्यामुळे येथील राजवाडा हॉटेल मध्ये थांबलो. खाण्यासाठी भजी मागवली. त्यावेळी १२ दिवसांपूर्वी चिंचवड येथे खून झालेल्या आकाश लांडगे याच्या एका नातेवाईकाचा फोन आला. आज (सोमवारी) आकाशचा बारावा विधी होता. त्या कार्यक्रमात तू जेवायला ये, अशी माहिती त्या नातेवाईकाने फोनवर दिली. फोन झाल्यानंतर निहालला मित्राच्या खुनाचे दुःख सहन झाले नाही. निहालने स्वतःच्या कमरेला असलेल्या पिस्टूलमधून स्वतःवर गोळी झाडली. ही गोळी त्याच्या डोक्याला लागली. यामध्ये निहाल गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ चिंचवडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
























Join Our Whatsapp Group