पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतून यशवंतराव चव्हाण तसेच, शरद पवार यांचे विचार संपू देणार नाही. ज्यांना जायचे होते ते गेले मात्र, जनता मात्र इथेच आहे. याच जनतेसाठी, गोरगरिबांच्या घरांसाठी रस्त्यावर उतरा, संघर्ष करा. महापालिकेत शरद पवारांच्या विचारांची सत्ता येईल आणि पिंपरी चिंचवडचा महापौर शरद पवार ठरवणार, असा विश्वास पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सरचिटणीस रोहित पवार यांचा सत्कार सोहळा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, विकास लवांडे, शहराध्यक्ष तुषार कामठे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, रविकांत वर्पे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, इम्रान शेख, महिलाध्यक्षा ज्योती निंबाळकर, माधव पाटील, सागर चिंचवडे, श्रीमंत जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले म्हणाले, की सरकारने लाडक्या बहिणीच्या योजनेला निकष लावून त्यांना लाभ देणे बंद करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बहिणी संतापल्या आहेत. महापालिका निवडणुकीनंतर निकष लावण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे. त्यानंतर ८० टक्के महिलांचे पैसे बंद होणार आहेत. राज्यात तीन इंजिनचे सरकार आहे. कोण टॉवेलवर मारहाण करतोय, कोण पैशांची बॅग घेऊन सिगारेट ओढतोय. ज्यांनी मारामारी केली त्यांनी माजी खासदाराला आव्हान देत स्टॅम्प पेपरवर मारामारीचा करार करण्याची भाषा करीत आहे. पोलिस विभाग हतबल झाले आहे.

या मेळाव्यात विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले. शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या हस्ते शिंदे व पवार यांचे भक्ती-शक्तीची प्रतिकृती देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, विविध सेल व पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार झाला. सागर चिंचवडे यांनी आभार मानले.

शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, की विधानसभेला त्यांना पक्षात घेऊन तिकीट देऊन नका, असे सांगूनही त्यांना प्रवेश दिला गेला. ते आपले काम झाल्यानंतर पुन्हा त्या पक्षात गेले. महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत मोठा भ्रष्टाचार बोकाळला असून, भाजपच्या दोन आमदारांनी शहर अर्धे-अर्धे वाटून घेतले आहे.

कारवाईला न घाबरता काम करा – रोहित पवार
सरकारच्या विरोधात बोललो की ईडी व इतर कारवाई होते. कारवाईला न घाबरता कामाला लागा. आंदोलन, मोर्चे काढा. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी असलेला गटतट बाजूला सारुन एक व्हावा. पिंपरी-चिंचवडकरांच्या मदतीला धावून जा, असा सल्ला देत विधीमंडळ अधिवेशनामध्ये मंत्री पत्ते खेळतात. त्यांना शेतकऱ्यांचे हित माहीत नाही. मात्र, तो खेळ खेळताना बँक खाते जोडावे लागते हे माहीत होते, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.
























Join Our Whatsapp Group