पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील वर्ग शिक्षकाने स्वतःच्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत वारंवार अश्लील गैरवर्तन करून तिचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

११ जुलै ते १९ जुलै २०२५ दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पालकाच्या तक्रारीवरून निगडी पोलीस स्टेशन येथे नराधम शिक्षका विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून निगडी पोलिसांनी या शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.

अधिक माहिती घेतली असता निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये एका शिक्षकाने सातवीमध्ये शिकणाऱ्या पीडित मुलीला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं. या संदर्भात निगडी पोलीस स्टेशन येथे पोक्सो, विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गेल्यावर्षी ९ जुलै रोजी आरोपी शिक्षक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाला होता. काही काळानंतर शिक्षकाने पीडित मुलीला जाणीवपूर्वक केंद्रित करून तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य केले. कित्येक महिने पीडित मुलीने घाबरून घरच्यांना न सांगता या गोष्टी मनात दाबून ठेवल्या होत्या. परंतु आरोपी शिक्षकाच्या वारंवार होणाऱ्या लैंगिक छळास सामोरे जावे लागले. पीडित मुलीला धमकीवजा बोलून तिच्या मनाविरुद्ध या गोष्टी केल्याचे पीडितेने कुटुंबास कळवल्यानंतर या गोष्टी समोर आल्या. त्यानंतर निगडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून विनयभंग, ॲट्रॉसिटी, पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यात नराधम शिक्षकास अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी पुढील तपास निगडी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांनी ही माहिती दिली.























Join Our Whatsapp Group