नवी सांगवी (Pclive7.com):- जुनी सांगवी परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण आहेत. जेव्हा पाणीपुरवठा होतो, त्या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जातो, यामुळे नागरिकांना पाण्यासारख्या मूलभूत गरजेपासून वंचित रहावे लागत असून, प्रशासनाचे याकडे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने स्थानिक नागरिकांसह भाजपाने गुरुवारी (दि.३१) सकाळी ११ वाजता सांगवी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी भाजपचे सांगवी मंडळ अध्यक्ष गणेश ढोरे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, भाजपा उपाध्यक्ष जवाहर ढोरे, प्रदीप झांजुर्णे, अमित गवळी, हर्षद मोहरे, विशाल सोमवंशी, हिरेन सोनवणे, विकी सोनवणे, अविनाश मारणे, सुभाष भोळे, संजय देशमुख, विलास दळवी, श्रीधर पंडित, नारायण हिरवे, पद्माकर तेहरे, स्वामी घोरपडे उपस्थित होते. या वेळी पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत करावा. पाण्याच्या बीजगणक वाचनाचे वेळापत्रक निश्चित करावे आणि काटेकोर पालन करावे. विभागीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांची बैठक घेऊन समस्येचे समाधान करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात जुनी सांगवी परिसरातील मधुबन सोसायटी, आनंदनगर, शितोळेनगर यांसारख्या आदी भागातील नागरिक सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि तरुणवर्गाने जोरदार घोषणांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

नागरिकांच्या आणि भाजपाच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सुरेश गवारी स्वतः आंदोलन स्थळी हजर झाले. त्यांनी आंदोलन कर्त्यांसोबत संवाद साधून जुनी सांगवी परिसरातील नागरिकांना आश्वासन दिले की, पाणीपुरवठ्याच्या वेळेस लाईटची टंचाई भासणार नाही, आणि विजेचा नियमित पुरवठा सुनिश्चित केला जाईल.






















Join Our Whatsapp Group