पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेची चारसदस्यीय प्रभागरचना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाला महापालिका निवडणूक विभागाने मंगळवारी (दि.५) सादर केली. प्रभागरचनेचा नकाशा यानंतर मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर २२ ऑगस्टला महापालिकेच्या वतीने प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रभागरचनेची हद्द कशी आहे, याबाबत राजकीय वर्तुळासह इच्छुकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची सन २०१७ ला होणारी निवडणूक आता होत असल्याने माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रभागरचना कशी असणार, याबाबत तर्क-विर्तक लढविले जात आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे त्याबाबत वारंवार विचारणा केली जात आहे.

दरम्यान, महापालिका १२ मार्च २०२२ रोजी बरखास्त झाली. तेव्हापासून म्हणजेच १३ मार्च २०२२ पासून महापालिकेमध्ये प्रशासकराज सुरू आहे. आयुक्त हेच संपूर्ण कामकाज पाहत आहेत. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या पथकाने प्रभागरचनेचे नकाशे तयार केले आहेत. शहराची सन २०११ ची जनगणना विचारात घेऊन प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्या निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेच्या समितीने तयार केलेल्या प्रभागरचनेवर आयुक्त शेखर सिंह यांनी तपासणी करून रविवारी (दि.३) स्वाक्षरी केली आहे.
प्रारूप प्रभागरचनेचा नकाशा राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे मंगळवारी (दि.५) सादर केले आहेत. त्यानंतर नकाशे राज्य निवडणूक आयोगास ६ ते ११ ऑगस्ट या कालावधीत सादर केला जाणार आहे. आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रारूप प्रभागरचनेचे नकाशे २२ ऑगस्टला प्रसिद्ध करून त्यावर २८ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, नवीन प्रभाग रचना फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीनुसार असणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर दिवाळीनंतर डिसेंबर ते जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता आहे.






















Join Our Whatsapp Group