पिंपरी (Pclive7.com):- सयाजी शिंदे हे ‘ट्री-मॅन’ आहेत. त्यांनी केवळ अभिनयाचा सुवर्ण अध्याय लिहिला नाही, तर ‘सह्याद्री वनराई’च्या माध्यमातून लाखो लोकांना श्वास दिला आहे. आजचा सोहळा हा पर्यावरण योद्ध्यांचा गौरव करण्याचा आहे. हरित भारताचे ते शिल्पकार आहेत. त्याचे हिरवाईचे स्वप्न पूर्ण होवो. अशीच हिरवाई, त्यांची मायेची सावली आमच्या समवेत राहो, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.८) चिंचवड येथे काढले.

चिंचवड येथे सह्याद्री वनराई संस्थेच्या वतीने अभिनेते, ‘ट्री-मॅन’ सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा झाला. त्यात पवार बोलत होते. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, जादव पायांग, मम्मुनी पायांग, मनोहर जगताप उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, आमचे सहकारी मित्र, सुप्रसिद्ध अभिनेते आणि ट्रि-मॅन म्हणून ओळखले जाणारे, सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजीराव शिंदे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या आजवरच्या जीवनातील कारकिर्दीत उत्कृष्ट अभिनयाचा सुवर्ण अध्याय सयाजीरावांनी लिहिला आहे. त्यासहित ‘सह्याद्री देवराई’च्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात मोलाचं योगदान दिलं आहे. राज्याच्या विविध भागांत ४० हून अधिक देवराई निर्माण करून वृक्षारोपण करण्याचं काम त्यांनी केलं आहे. या कार्यात विकास नलावडे, रवींद्र भैरट यांच्यासारख्या अनेक सहकाऱ्यांची सयाजीरावांना भक्कम साथ लाभली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कामात निस्वार्थ भावनेनं कार्यरत असणाऱ्या या तमाम सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक.

सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात हिरवाईचं स्वप्न रुजवणारे, महाराष्ट्राचे ट्री मॅन सयाजीराव यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री देवराई संस्थेच्या माध्यमातून राज्यभरात जवळपास एक लाख झाडं लावण्यात येत आहेत, पर्यावरण संवर्धनाचा संकल्प अधिक बळकट करण्याचं काम केलं जात आहे.

यावेळी आसाम येथील भारताचे वनपुरुष पद्मश्री जादव पायेंग आणि त्यांची कन्या, आसामी वनराणी मुनमुनी पायेंग देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. पायेंग यांनी आसाममध्ये आतापर्यंत जवळपास १२ लाख झाडं लावली आहे, ही खरोखरंच कौतुकास्पद बाब आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं सुद्धा पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत सक्रिय भूमिका घेतली आहे. त्याच दृष्टीकोनातून काल बीड जिल्ह्यात एका दिवसात ३० लाख झाडं लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था, विद्यार्थी वर्ग, पोलीस प्रशासन, वन विभाग आदींनी मोलाचा सहभाग नोंदवला. झाड लावणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्त्वाचं आहे.
आपल्या महायुती सरकारनं या चालू वर्षात राज्यभरात दहा कोटी झाडं लावण्याचा निर्धार केला आहे. यापैकी एक कोटी झाडं एकट्या बीड जिल्ह्यात लावली जाणार आहेत. वन विभागाकडून देशी झाडांची रोपं मोफत देण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे. पुढील चार वर्षांत जास्तीतजास्त झाडं लावण्याचा आमचा मानस आहे. त्याप्रमाणे ती झाड जगवणं, हा देखील आमचा प्रयत्न राहणार आहे असे शेवटी बोलताना अजित पवार म्हणाले.






















Join Our Whatsapp Group